नागपुरात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूवर गुन्हे शाखेचा मोठा छापा; तिघे अटकेत, मशीनसह मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात बेकायदेशीर सुगंधी तंबाखू विक्रीवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. नवीन कामठी परिसरात गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली असून बंदी असलेला सुगंधी तंबाखू आणि तो तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची गुप्तपणे विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नवीन कामठी परिसरात सापळा रचत छापा टाकला. या कारवाईत वेगवेगळ्या ब्रँडचा बंदी असलेला सुगंधी तंबाखू, तयार माल तसेच तंबाखू प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाणारी मशीन जप्त करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९८ हजार ९५० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.
या कारवाईमुळे नागपूर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर सुगंधी तंबाखू विक्रीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



