पुणे चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरण; शवविच्छेदन अहवालात गुदमरल्याने मृत्यूची पुष्टी

पुण्यातील चार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या संतापजनक प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्या तोंडात कापड कोंबून तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिचा श्वास रोखला गेला आणि गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून त्याच्याविरोधात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या गावाला भेट देत ग्रामस्थांची भेट घेतली आणि कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणात दोषीला कठोर शिक्षा होईल आणि जलदगतीने न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.



