citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात सासरच्या छळाला कंटाळून माय-लेकीची आत्महत्या? नंदनवनातील दुर्दैवी घटनेने शहर हादरलं

नागपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरच्या कथित छळाला कंटाळून माय-लेकीने एकाच घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.

नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना समाजमन सुन्न करणारी ठरली आहे. मृतांमध्ये आकांक्षा बर्म्हे (व्यवसाय – इंजिनिअर) आणि तिची आई संगीता श्रीराम ढबाले (व्यवसाय – शिक्षिका) यांचा समावेश आहे. माय-लेकींनी एकत्रितपणे आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा बर्म्हे ही गर्भवती होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिचं बाळ गर्भातच दगावलं होतं. या धक्क्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यातच सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळामुळे तिची मानसिक अवस्था अधिकच बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

अखेर या सततच्या मानसिक तणावाला कंटाळून आकांक्षा आणि तिच्या आईने रात्रीच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी आकांक्षाच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या लोकांची चौकशी सुरू केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजातील वाढत्या मानसिक ताणतणाव, कौटुंबिक छळ आणि भावनिक असुरक्षिततेचं गंभीर चित्र अधोरेखित करणारी आहे. या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button