Uncategorized

अमरावतीत ‘ओपन बार’ संस्कृतीवर पोलिसांचा दणका; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ७६ जणांवर कारवाई

अमरावती शहरात रस्त्यावर दारू पिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ‘ओपन बार’ संस्कृतीला जोरदार लगाम घातला आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन कायद्याची पायमल्ली करणाऱ्या तळीरामांना अमरावती पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून, शहर गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत तब्बल ७६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. रस्त्याच्या कडेला, हातगाड्यांवर, चौकांमध्ये आणि अंधाऱ्या कोपऱ्यांचा फायदा घेत खुलेआम मद्यपान केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत विविध भागांत एकाच वेळी धडक कारवाई केली. या मोहिमेत कठोर नाका, किशोर कॉलनी, दस्तूर नगर, चौरे नगर, सिंधी चौक, शेगाव नाका आणि इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात छापेमारी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी बसून दारू पित असलेल्या ७६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही जण रस्त्याच्या कडेला, काही हातगाड्यांजवळ तर काही अंधाराचा फायदा घेत मद्यपान करताना आढळून आले.

पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा कायदेशीर गुन्हा असून, अशा प्रकारांमुळे सार्वजनिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अमरावती पोलिसांनी या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरातील रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे ‘ओपन बार’ नाहीत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार आहेत.

या धडक कारवाईमुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे.

मजा करा… पण नियमांच्या चौकटीत राहूनच… कारण कायदा सर्वांसाठी सारखाच आहे, हा स्पष्ट संदेश अमरावती पोलिसांनी पुन्हा एकदा दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button