“फिल्मी स्टाईल कारवाई! SDO शुक्लांचा मेलघाटात ‘रेती माफियां’वर सर्जिकल स्ट्राईक”

अमरावती जिल्ह्यातील मेलघाट परिसरात अवैध रेती उत्खननाविरोधात प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत रेती माफियांना मोठा धक्का दिला आहे. उपविभागीय अधिकारी (SDO) शुक्ला यांनी स्वतः पुढाकार घेत, अक्षरशः फिल्मी स्टाईलने ही मोहीम राबवली.
गुप्त माहितीच्या आधारे शुक्ला यांनी रात्रीच्या अंधारात दुचाकीवरून परिसराची गुप्त पाहणी केली. सोनाबर्डी रेती घाटावर अवैध वाहतूक सुरू असल्याची खात्री होताच त्यांनी थेट घटनास्थळी धडक दिली. अधिकाऱ्यांची चाहूल लागताच एक ट्रक भरून रेती घेऊन पळ काढण्यात यशस्वी झाला, मात्र एक ट्रॅक्टर प्रशासनाने जप्त केला.
ट्रॅक्टर चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक सोनाबर्डी घाटावर पोहोचले. तेथे तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघड झाले. अंधाराचा फायदा घेत पोकलॅंड मशीन लपवण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पोलिसांच्या मदतीने संयुक्त छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोकलॅंड आणि JCB सारखी अवजड यंत्रसामग्री जप्त करण्यात आली, तर काही मशीन सील करण्यात आल्या.
या धाडीनंतर सोनाबर्डी घाट परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तापी नदीवरील अवैध उत्खननावर प्रशासनाने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
धाडसी कारवाईमुळे प्रशासनाचा धाक निर्माण झाला असला, तरी अवैध रेती उत्खननावर कायमस्वरूपी आळा बसतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



