AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

राजस्थानात अमरावती पोलिसांची फिल्मी कारवाई; २.८० किलो MD ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड

अमरावती : अमरावती शहर पोलिसांनी धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत थेट राजस्थानमध्ये घुसून मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ‘सरफरोश’ सिनेमाची आठवण करून देणाऱ्या या ऑपरेशनमध्ये २.८० किलो एमडी (MD) ड्रग्स प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

या कारवाईची सुरुवात २ मार्च २०२६ रोजी अमरावतीत करण्यात आलेल्या ड्रग्स जप्तीपासून झाली. त्यावेळी २ किलो ८० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्याच धाग्याचा पाठलाग करत पोलिसांचे पथक थेट राजस्थानमध्ये पोहोचले.

गेल्या महिनाभरापासून पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील टीम गुप्त मोहिमेवर होती. तपासादरम्यान उघड झाले की, ड्रग्स राजस्थानमधील गुप्त फॅक्टरीत तयार होत होते आणि एजंटमार्फत अमरावतीत पाठवले जात होते. या व्यवहारात हवाला मार्गाचा वापर करण्यात येत होता.

या रॅकेटची साखळी नागौर, जयपूर आणि जोधपूरपर्यंत पसरलेली असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, मुंबईतील माहीम परिसरातील आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर अजीम सय्यद असद शेख याचेही नाव या प्रकरणात पुढे आले आहे.

फिल्मी सापळा रचून आरोपी जेरबंद
पोलिसांनी प्रतापगड जिल्ह्यातील रिया गावात सापळा रचला. काही पोलीस रेती कामगार बनून तर काही धाब्यावर लक्ष ठेवून होते. योग्य क्षण साधत कारवाई करण्यात आली.

मांगीलाल सिंघावत आणि विष्णुलाल गायरी हे दोघे धाब्यावर पोहोचताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत त्यांना अटक केली.

या कारवाईत ड्रग्स तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास सुरू
या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ५ आरोपी फरार आहेत. पोलिसांचा तपास आता आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कपर्यंत पोहोचला आहे.

पोलिसांची धाडसी कामगिरी
धाडस, अचूक नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करत अमरावती पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, गुन्हेगार कितीही मोठा असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही.

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button