BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

साकोलीत नरभक्षक वाघिणीचा कहर; एकाचा मृत्यू, महिला जखमी, संतप्त ग्रामस्थांचा सहा तास रस्ता रोको

भंडारा : जिल्ह्यातील साकोली तालुक्यात नरभक्षक वाघिणीचा कहर सुरूच असून सलग दोन हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ तब्बल सहा तास रस्ता रोको आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील ५० वर्षीय वसंता मेश्राम यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच २८ मार्च रोजी उमरझरी येथील ४८ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने यांच्यावरही वाघिणीने हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

सलग हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २९ मार्च रोजी साकोली–तिरोडा मार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडले. सुमारे सहा तास चाललेल्या या आंदोलनात “नरभक्षक वाघिणीला तात्काळ जेरबंद करा” आणि “जखमी महिलेला तातडीने आर्थिक मदत द्या” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ झाल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले, भाजप नेते नेपाल रंगारी आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे यांनी घटनास्थळी भेट देत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर वनविभागाने जखमी महिलेला मदत देण्याचे आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

तथापि, पुढील आठ ते दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button