जंगलाच्या कुशीत स्वावलंबनाची नवी पहाट; किरंगी सर्रा गावात मशरूम उत्पादनातून महिलांचा आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या किरंगी सर्रा या दुर्गम गावात मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून परिवर्तनाची नवी कहाणी घडताना दिसत आहे. तीन बाजूंनी दाट जंगल आणि एका बाजूला नवेगाव खैरी पेंच धरणाचा जलाशय अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे गाव मात्र रोजगाराच्या अभावामुळे मोठ्या अडचणीत होते.
पारशिवणी तालुक्याशी थेट रस्ता नसल्याने गाव पूर्णतः दुर्गम राहिले आहे. रोजगाराच्या शोधात गावकऱ्यांना जंगलात जाऊन मोहफूल गोळा करावे लागत होते. मात्र, हा भाग कोअर झोनमध्ये येत असल्याने त्यावर निर्बंध आले आणि गावासमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहिला.
अशा परिस्थितीत चोरबाहुलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी पुढाकार घेत गावात मशरूम उत्पादनाचा अभिनव उपक्रम सुरू केला. आज या उपक्रमामुळे गावातील सुमारे १८ ते २० महिला घरबसल्या मशरूम उत्पादन करत असून त्यांना रोजगाराचा नवा मार्ग मिळाला आहे.
प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मशरूमची लागवड करून अवघ्या एका महिन्यात उत्पादन तयार केले जाते. हे ताजे मशरूम चोरबाहुली गेटवर येणाऱ्या पर्यटकांना विकले जात असल्याने महिलांना घरबसल्या उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे.
महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत “आता आम्हाला जंगलात जावे लागत नाही, घरबसल्या रोजगार मिळतोय,” अशी भावना व्यक्त केली आहे.
या उपक्रमाच्या यशामागे वनरक्षक कृष्णा बेलकर, प्रियांका झारखंडे तसेच क्षेत्र सहाय्यक गणेश खंडाईत यांचे मोलाचे योगदान आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी रोजगारनिर्मिती उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
छोट्या उपक्रमातून मोठा बदल घडू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण असून जंगलाच्या कुशीत आता स्वावलंबनाची नवी पहाट फुलताना दिसत आहे.



