Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बडनेऱ्यात ‘गौजल सेवा’ उपक्रम; उन्हात तहानलेल्या गौमातांसाठी पुढाकार

बडनेरा : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माणसांसह मुक्या प्राण्यांचीही मोठी परवड होत असताना बडनेरा शहरातून एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी उपक्रम समोर आला आहे. “साप्ताहिक गौ सेवा अभियान”च्या वतीने ‘गौजल सेवा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, रस्त्यावर भटकणाऱ्या गौमातांच्या तहानेची काळजी घेतली जात आहे.

उन्हाचा कडाका वाढत असताना शहरातील विविध ठिकाणी पाण्याची भांडी ठेवून गौमातांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. “एकही गौमाता तहानलेली राहू नये” हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाचा शुभारंभ परमपूज्य संत श्री राम बाबा यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

गेल्या काही महिन्यांपासून हे अभियान सातत्याने कार्यरत असून, आता ते जनचळवळीचे स्वरूप घेत असल्याचे दिसून येत आहे. दर आठवड्याला गौमातांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली जाते. या उपक्रमाला स्थानिक नागरिक आणि मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या वेळी संत राम बाबा, चंदूमल बिल्दानी, जीतू मोटवानी, दौलत बजाज, ठाकुर हेमनानी, श्रीचंद बिल्दानी, सुरेश हेमनानी, गोपीचंद बिल्दानी, नारायण हेमनानी, विनोद रेड्डी, दीपक मोटवानी, विनोद झंझाड, राजू धामळे, राम रुग्वाणी आणि विनय मोटवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत, समाजातील प्रत्येक नागरिकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच ज्या ठिकाणी ही जलसेवा सुरू आहे, त्या ठिकाणी संपर्क क्रमांक देण्यात आले असून अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘गौजल सेवा’ हा उपक्रम समाजातील संवेदनशीलता आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button