शेतीच्या वादातून दुहेरी खून; वडील-मुलाचा कुऱ्हाडीने निर्घृण खात्मा

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका अंतर्गत हिंगणगाव येथे शेतीच्या वादातून दुहेरी खून झाल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत वडील आणि मुलाचा निर्घृण खून करण्यात आला असून आरोपी स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शितल मारुती कुंडले (वय ४५) आणि त्यांचे वडील मारुती बंडू कुंडले (वय ७२) यांच्यावर कुऱ्हाड आणि खोऱ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, जमिनीच्या वाटपावरून कुंडले कुटुंबात मागील काही दिवसांपासून सतत वाद सुरू होता. काल सायंकाळी पुन्हा वाद उफाळल्यानंतर संतापाच्या भरात मोठा भाऊ संभाजी कुंडले याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेनंतर आरोपी संभाजी कुंडले स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेत त्याचा मुलगा विवेक कुंडले हाही जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, या वादाबाबत चार दिवसांपूर्वीच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, वेळेत ठोस कारवाई झाली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संपूर्ण हिंगणगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



