agriculturecitynewsJalgaonLatest NewsMaharashtra

गावरान आंबा नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर; रावेर तालुक्यात आमराईंचा लोप

जळगाव : ग्रामीण भागाची ओळख असलेला गावरान आंबा आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र रावेर तालुक्यात दिसून येत आहे. एकेकाळी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असलेली आमराई आता हळूहळू इतिहासजमा होत आहे.

रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक शेतात आंब्याची झाडे हमखास दिसत असत. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात आमराई असून त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, सध्याच्या बदलत्या परिस्थितीत गावरान आंब्याची झाडे क्वचितच आढळत आहेत.

यामागे अनेक कारणे समोर येत आहेत. शेती क्षेत्र कमी होत चालल्याने शेतकरी आंब्याची झाडे तोडत आहेत. झाडांच्या सावलीमुळे पिकांचे उत्पादन घटते, अशी धारणा असल्यानेही अनेकांनी आंब्याची झाडे काढून टाकली आहेत. तसेच गावरान आंबा फळ देण्यासाठी १० ते १२ वर्षांचा कालावधी घेत असल्याने शेतकरी जलद उत्पन्न देणाऱ्या कलमी आंब्याकडे वळले आहेत.

बाजारात विविध सुधारित कलमी जाती उपलब्ध झाल्यामुळे गावरान आंब्याची लागवड घटली आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्ती, वादळे तसेच वाळवीसारख्या कीडरोगांमुळे अनेक झाडांचे नुकसान झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, गावरान आंबा हा केवळ एक फळ नसून आपल्या पारंपरिक शेती संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र आधुनिक शेती पद्धती आणि बदलत्या आर्थिक गणितांमुळे हा वारसा हरवत चालला आहे.

वेळीच संवर्धनासाठी उपाययोजना न केल्यास गावरान आंबा लवकरच इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button