अजिंठा-बुलढाणा महामार्गावरील अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

बुलढाणा : अजिंठा-बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत तरुणाचे नाव नितीन रामदास मोकासरे (वय २५) असे असून, तो लग्न समारंभातून पायी घरी परतत असताना धावडा बसस्थानकाजवळील तांगडा फाट्यावर आठवडाभरापूर्वी हा अपघात घडला होता. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत नितीनला बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरत शनिवारी (दि. २८) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नितीन मोकासरे हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या कुटुंबासाठी तोच आधार होता. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत संभाजीनगर येथील अॅड. उदय देशमुख यांनी मयताच्या कुटुंबीयांची भेट घेत ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच अशा अपघातांना आळा बसण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे.



