पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; IMD कडून ४ एप्रिलपर्यंत वादळी व गारपिटीचा इशारा

पुणे : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यासह राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी भारतीय हवामान विभागाने (IMD) ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान राज्यात वादळ, जोरदार वारे आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
पुण्यातील औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या भागांत हलक्या सरींसह ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. बाणेर परिसरात काही ठिकाणी अल्पकाळ गारपीटही झाली, ज्यामुळे हवामानातील अचानक बदलाची तीव्रता जाणवली.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असताना आलेल्या या पावसामुळे तात्पुरता गारवा निर्माण झाला आहे. मात्र, अचानक बदललेल्या हवामानामुळे वाहतूक कोंडी, पाणी साचणे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
IMD च्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात अस्थिर हवामान राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



