रेल्वेचा मोठा अॅक्शन; चेन पुलिंगवर कडक कारवाई, हजारो जणांवर गुन्हे

नवी दिल्ली :
रेल्वेत विनाकारण चेन पुलिंग करणाऱ्यांविरोधात आणि महिला डब्यात प्रवास करणाऱ्या पुरुषांवर रेल्वे प्रशासनाने कडक मोहीम राबवली असून हजारो प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
उत्तर रेल्वेने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत सुमारे 16,000 प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवले असून त्यापैकी तब्बल 14,000 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तसेच पूर्व मध्य रेल्वेने मार्च 2026 मध्ये 514 जणांकडून ₹1.46 लाखांचा दंड वसूल केला आहे.
याशिवाय ‘ऑपरेशन महिला सुरक्षा’ अंतर्गत महिला डब्यात प्रवास करणाऱ्या 1,570 पुरुष प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सामान्यतः काही प्रसंगी आपत्कालीन परिस्थितीत चेन पुलिंग करणे आवश्यक असते. मात्र अनेक वेळा विनाकारण किंवा जाणूनबुजून चेन पुलिंग केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी रेल्वेने कठोर भूमिका घेतली आहे.
दरम्यान, नियमभंग करणाऱ्यांवर पुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.



