देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीची हत्या; कर्नाटकमध्ये थरकाप उडवणारी घटना

कर्नाटकमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून एका तरुणाने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे दाम्पत्य मूळचे पुणे जिल्ह्यातील बारामती येथील असून देवदर्शनासाठी गेलेल्या प्रवासातच ही भयावह घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शैला (वय २८) आणि तिचा पती अक्षय हे दोघे कर्नाटकातील कलबुर्गा जिल्ह्यातील गाणगापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. मात्र, प्रवासादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर इतक्या टोकाच्या हिंसाचारात होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
रागाच्या भरात अक्षयने रस्त्याच्या कडेला कार थांबवली आणि पत्नीला बाहेर ओढत तिच्यावर बेदम मारहाण सुरू केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. एवढ्यावरही न थांबता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या अंगावरून त्याने कार चालवत तिला चिरडून टाकले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी मदत करण्याऐवजी व्हिडीओ चित्रीकरण केले. शैला मदतीसाठी आर्त हाक देत होती, मात्र तिला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही.
दरम्यान, काही लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी अक्षयचा संताप एवढा तीव्र होता की तो पत्नीचा जीव घेतल्याशिवाय शांत झाला नाही.
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत अक्षयने ही हत्या पूर्वनियोजित पद्धतीने केली. देवदर्शनाच्या बहाण्याने त्याने शैलाला कर्नाटकमध्ये नेले आणि कट रचून तिचा जीव घेतला.
या घटनेनंतर कलबुर्गा पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



