अमरावतीत ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; विभागात खळबळ

अमरावती शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्युटीवर असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती पोलीस आयुक्तालयातील QRT (क्विक रिस्पॉन्स टीम) विभागात कार्यरत असलेले विजय दिलीप नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. ते नाईट ड्युटीवर होते आणि सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शस्त्र जमा करत असताना त्यांनी सेवेतील पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडली.
ही घटना QRT कार्यालयातच घडल्याने संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी गर्दी केली.
विजय नागापुरे हे २०१४ बॅचचे पोलीस कर्मचारी असून ते अविवाहित होते. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.



