नागपुरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उघड; ६ जनावरे व बोलेरो पिकअप जप्त

नागपूर शहरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे. Pachpaoli Police Station हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ जिवंत जनावरे आणि बोलेरो पिकअप वाहन असा सुमारे ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१५ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास Pachpaoli Police Station हद्दीत पोलिसांचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते.
यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कडबी चौक येथून मोतीबाग चौकाकडे एका महिंद्रा बोलेरो पिकअपमधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी भोला हायस्कूल जवळ सापळा रचला. काही वेळात संशयित बोलेरो पिकअप दिसताच पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला.
मात्र वाहन थांबताच चालक आणि त्याचा एक साथीदार गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाले.
पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ६ जिवंत गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने चारा-पाणी न देता बांधून ठेवलेली आढळून आली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जनावरे आणि बोलेरो पिकअप वाहन असा सुमारे ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बचावलेली जनावरे पुढील काळजीसाठी गौशाळेत दाखल करण्यात आली आहेत.
या प्रकरणी फिर्यादी पोलीस अंमलदार राजू सूर्यभान श्रीवास यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



