वाघोड पिक संरक्षण संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हरभरा चोरी प्रकरणात अर्ज निकाली काढल्याचा आरोप

रावेर तालुक्यातील वाघोड येथील पिक संरक्षण संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकऱ्याच्या मुलाने चोरी झालेल्या हरभरा पिकाबाबत नुकसानभरपाईसाठी दिलेला अर्ज संस्थेने निकाली काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
रावेर तालुक्यातील वाघोड गावातील शेतकरी रमेश हरिभाऊ पाटील यांच्या शेती गट क्रमांक ६१ मधील हरभरा पिकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांच्या मुलगा कमलेश पाटील यांनी स्वतःच्या नावाने वाघोड पिक संरक्षण संस्थेकडे अर्ज करून पिकाची पाहणी, पंचनामा आणि नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी केली होती.
मात्र आठ दिवस उलटल्यानंतर संस्थेच्या बैठकीत अर्जदार शेतकरी नसल्याचे कारण देत हा अर्ज निकाली काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासोबतच उपनिबंधक कार्यालयात चौकशी केली असता कोणतेही लेखी उत्तर देता येणार नाही, असे तोंडी सांगण्यात आल्याचेही कमलेश पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या मुलांनाच शेतकरी असल्याचा पुरावा मागितला जात असल्यास हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधित संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात राज्याचे सहकार मंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही कमलेश पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे वाघोड पिक संरक्षण संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता सहकार मंत्री या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.



