अमरावती–नागपूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

अमरावती :
अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सिटी लँड मार्केटच्या गेटसमोर शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेला इसम जागीच ठार झाला, तर दुचाकी चालवत असलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. गंभीर जखमी युवकाला तत्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, फरार ट्रक चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून, महामार्गावर तातडीने योग्य सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, फरार ट्रक चालकाला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.



