सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगाव येथे भव्य महोत्सव; राष्ट्रीय स्मारकासाठी २०० कोटींचा निधी मंजूर

पुणे / नायगाव :
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्याजवळील त्यांच्या जन्मगाव नायगाव येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण विदर्भातून हजारो नागरिक नायगावकडे रवाना झाले असून, कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी नायगाव येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीला अखेर यश आले असून, राज्य शासनाने या स्मारकासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या निधीतून राष्ट्रीय स्मारकासह महिलांसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विदर्भातून मोठ्या प्रमाणात जनसागर नायगावकडे रवाना झाला आहे. ओबीसी नेते ॲड. राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने तब्बल १०० बसेस विदर्भातून पाठवण्यात आल्या आहेत. या माध्यमातून १० हजारांहून अधिक अनुयायी व कार्यकर्ते नायगाव येथे दाखल होणार आहेत.
हा महोत्सव केवळ जयंती सोहळा न राहता, सामाजिक एकता, स्त्री शिक्षण आणि महिला सशक्तीकरणाचा प्रतीकात्मक उत्सव ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.



