साकोली तालुक्यात अल्पवयीन मुलीवर दीड वर्षांहून अधिक काळ लैंगिक अत्याचाराचा आरोपआरोपीविरोधात बलात्कार व पॉक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल

भंडारा / साकोली : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि समाजाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, शुभम मेश्राम (वय 28, रा. लाखनी, जि. भंडारा) याने अल्पवयीन मुलीचा आधी विश्वास संपादन केला. विश्वास जिंकल्यानंतर तिला फसवणुकीच्या जाळ्यात ओढून विविध ठिकाणी — हॉटेल, लॉज तसेच निर्जन परिसरात — नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे, तर ही बाब कुणाला सांगितल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवे मारून टाकीन, अशी अमानवी धमकी देत आरोपीने पीडितेला दीर्घकाळ भीती व मानसिक दबावाखाली ठेवले, अशी माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली आहे. हा कथित अत्याचार फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दीर्घ काळाच्या छळानंतर अखेर पीडितेने धैर्य दाखवत संपूर्ण प्रकार कुटुंबीयांसमोर उघड केला. त्यानंतर साकोली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार, अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार, धमकी, फसवणूक तसेच पॉक्सो कायद्यान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर साकोली परिसरात संतापाची लाट उसळली असून, “आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का?” असा जळजळीत सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पालक, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.



