इंडोनेशियात भीषण पूर आणि दरडी : मृतांची संख्या 49 वर; बेपत्ता 67, शोधमोहीम वेगात

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुर आणि दरडींसह नैसर्गिक आपत्तीने भीषण रूप धारण केले आहे. आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला असून 67 जण बेपत्ता आहेत. गुरुवारी (27 नोव्हेंबर) नदीपात्रे, गावांच्या भगदाडांमध्ये आणि ढिगाऱ्यात अडकलेल्या मृतदेहांचा तसेच जिवितांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी मोहिम अधिक तीव्र केली.
गत आठवडाभर चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर सुमात्रातील अनेक नद्यांना पूर आला. मंगळवारी (25 नोव्हेंबर) अचानक आलेल्या पुराच्या लाटेने डोंगर उतारावरील गावे उद्ध्वस्त केली, नागरिकांना वाहून नेले आणि 2,000 हून अधिक घरे व इमारती पाण्याखाली गेल्याचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. सुमारे 5,000 रहिवाशांनी सरकारी निवाऱ्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
दरम्यान, पुढील पावसाचे प्रमाण कमी करण्यासाठी इंडोनेशिया प्रशासन आता क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी करत आहे. आसपासच्या प्रांतांमध्येही पूर आणि दरडींमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो नागरिकांना यात फटका बसला आहे.



