Accident NewsNanded
नांदेडमधील अंबाडी घाटात भीषण अपघात, बोलेरो चालकाचा जागीच मृत्यू, १० जण जखमी
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अंबाडी घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि बोलेरो जीपची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात बोलेरो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ किनवट शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो जीप अंबाडी घाटातून उतरत असताना समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत बोलेरो वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले असून, एसटी बसलाही मोठे नुकसान झाले आहे.घटनेनंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, अंदाज व्यक्त केला जातो की घाटात वाहनांमधील वेगाचा ताळमेळ बिघडल्याने ही घटना घडली असावी.



