citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsNagpurpolitics

नागपूरच्या पाणीटंचाईवर जून २०२७ पर्यंतचे नियोजन

काही ठिकाणी पाणी कपात, टँकर आणि विहीर दुरुस्तीचे नियोजन; थांबवता येणाऱ्या विकासकामांऐवजी पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर प्रतिनिधी : नागपूर शहर आणि जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले असून, जून २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी काटकसरीसह विविध उपाययोजनांवर चर्चा सुरू असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नागपूर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. पाण्याचा अपव्यय रोखणे, आवश्यकतेनुसार पाणी कपात करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि विहिरींची दुरुस्ती करणे, अशा विविध उपाययोजनांचा विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

जनावरांच्या चाऱ्याचेही नियोजन

पाणी व्यवस्थापनाबरोबरच संभाव्य टंचाईच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या अध्यक्षतेखालील सब-कमिटीने घेतलेल्या निर्णयांची नागपूर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आल्याचे बावनकुळे म्हणाले.

यावर्षी थांबवता येणारी सिमेंट रस्त्यांची कामे, सौंदर्यीकरणाची कामे आणि इतर गैरतातडीच्या बांधकामांवर खर्च करण्याऐवजी पाणी व्यवस्थापन आणि शेतरस्त्यांसारख्या आवश्यक कामांना प्राधान्य देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

भूमि अभिलेख विभागातील १०६ अधिकाऱ्यांना पदोन्नती

महसूल विभागातील भूमि अभिलेख विभागातील १०६ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

पंधरा दिवसांच्या आत मोजणीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी भूमिका शासनाने स्वीकारली असून, या पदोन्नतीमुळे प्रशासनाला अधिक मजबूत पाठबळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच आयटीआय उत्तीर्ण अभियंत्यांना दरमहा ३५ हजार रुपये मानधन देऊन आवश्यक प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्याकडून काम करून घेण्याचे नियोजन असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

महायुतीतील वाचाळवीरांना पक्षांनी समज द्यावी

विधान परिषद निवडणुकीतील कामगिरीवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर संबंधित पक्षांनी आपल्या नेत्यांना आणि वाचाळवीरांना समज देण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.

अनावश्यक आरोप करून किंवा एकमेकांवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

फडणवीसांचा १२ वर्षांचा कार्यकाळ ऐतिहासिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील बारा वर्षे पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला आनंद असल्याचे बावनकुळे म्हणाले.

२०१४ हे वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे वर्ष ठरल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, त्यानंतर राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी विविध विकास योजना राबविण्यात आल्या. महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याबरोबरच राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

राज्याची अर्थव्यवस्था आणि विकासाच्या दृष्टीने मागील बारा वर्षांत मोठे बदल झाल्याचा दावा करत बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ ऐतिहासिक असल्याचे म्हटले.

माझ्या कार्यकाळाची देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाशी तुलना होऊ शकत नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पराभवाची जबाबदारी स्वीकारली

नागपूरमधील निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना बावनकुळे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. जिथे पराभव होतो, तिथे त्यातून शिकून पुढील निवडणुकीत अधिक ताकदीने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विरोधी पक्षातील मतदारांनी काँग्रेसला दुसऱ्या पसंतीची मते दिल्याने पराभव झाल्याचे आम्हाला मान्य असल्याचे ते म्हणाले. पुढील निवडणुकीत अधिक मतांनी विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसेच एका विशिष्ट पद्धतीने सरळ दुसऱ्या पसंतीची मते टाकली जात असल्याच्या मुद्द्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.

रोहित पवारांवर टीका

रोहित पवार यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, ते सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात.

आरोप करणाऱ्यांना रोखता येत नाही, मात्र सातत्याने नकारात्मक आरोप करणे हा त्यांचा दृष्टिकोन असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button