Accident NewsAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

वरखेड फाट्यानजीक भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; आठ महिन्यांची गर्भवती पत्नी पतीच्या प्रतीक्षेत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अमरावती | सिटी न्यूज

अमरावती-नागपूर महामार्गावर तिवसा तालुक्यातील वरखेड फाट्यानजीक भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील निखिल बोके आणि कैलास कळंबे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही उंबरखेड येथील रहिवासी होते. तिवसा येथून आपल्या गावी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल बोके आणि कैलास कळंबे हे दुचाकीने उंबरखेडकडे जात होते. त्याचवेळी नागपूर-अमरावती महामार्गावरील वरखेड फाट्यानजीक भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

बाळाच्या जन्माआधीच पित्याचे छत्र हरपले

या अपघातातील कैलास कळंबे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कैलास यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती असून, पुढील महिन्यात त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार होते. मात्र, बाळाचा जन्म होण्याआधीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

आनंदाच्या क्षणांची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबावर या दुर्दैवी घटनेमुळे शोककळा पसरली आहे. दोघांच्या मृत्यूने उंबरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

महामार्गावरील या अपघातानंतर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघात कसा घडला, याचा तपास सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

सिटी न्यूज | अमरावती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button