सावनेरमध्ये भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात

रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रात्री ९.३० वाजता अपघात; हितेश बनसोड यांनी रुग्णवाहिकेतून जखमीला रुग्णालयात पोहोचवले
सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ बुधवारी रात्री भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार सिद्धांत उत्तम आकरे (वय ३७) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कार क्रमांक एमएच ४० एआर ६२३४ आणि दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीएच ८४१५ यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने सिद्धांत आकरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. आकरे हे मूळचे राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून, सध्या सावनेर येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) मध्ये कार्यरत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना कळविले. त्यांनी तत्काळ सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर एपीआय दत्ता कानगुडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, हितेश बनसोड यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून जखमी आकरे यांना तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी कामठी येथील आशा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला. तथापि, चालकाने मद्यप्राशन केले होते किंवा नाही, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे. अपघाताची नोंद, वाहनांची तपासणी आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत पोलीस तपास सुरू आहे.



