Amaravti GraminBadneraNewscitynewsCrime News

बडनेऱ्यात श्रीराम मंदिरात लाखोंची चोरी! शटर वाकवून चोरट्यांचा प्रवेश; २० ते २३ लाखांचा ऐवज लंपास

हनुमानजींचा चांदीचा मुखवटा, गदा, मुकुट आणि छत्र्यांवर डल्ला; दोन दानपेट्याही फोडल्या, पोलिसांकडून तपास सुरू

शहरातील झिरी परिसरात असलेल्या श्रीराम मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिराचे शटर वाकवून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी देवतांच्या मौल्यवान चांदीच्या वस्तूंसह दोन दानपेट्यांमधील रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेल्या ऐवजाची अंदाजे किंमत २० ते २३ लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मंदिरातून चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये हनुमानजींचा अंदाजे दोन किलो वजनाचा मुखवटा, तीन किलो वजनाची गदा आणि दीड किलो वजनाचा मुकुट यांचा समावेश असल्याची माहिती आहे. याशिवाय चांदीची अंदाजे ७०० ग्रॅम वजनाची दोन छत्रे आणि श्याम बाबांच्या अंदाजे ५०० ग्रॅम वजनाच्या दोन छत्र्याही चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्याही फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या वस्तूंचे आणि रोख रकमेचे एकूण मूल्य २० ते २३ लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, दानपेट्यांमधील रोख रकमेचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस आणि न्यायवैज्ञानिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मंदिराची पाहणी करून घटनास्थळावरील आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यासोबतच चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्रीराम मंदिरातच लाखोंच्या ऐवजाची चोरी झाल्याने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंदिराचे शटर वाकवून चोरट्यांनी प्रवेश केल्याने सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा, रात्रीची गस्त आणि इतर सुरक्षा उपायांची तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावून आरोपींना अटक करावी आणि चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळवाव्यात, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button