
घोड्यावर स्वार होऊन घोषणा देत मेंढपाळ विभागीय आयुक्तालयावर धडकले; मोफत चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधा देण्याची मागणी
अमरावती : अमरावती विभागात दुष्काळी परिस्थितीमुळे मेंढपाळ समाजासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. चारा आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे मेंढ्या-शेळ्यांचे संगोपन करणे कठीण झाले असून, मेंढपाळ कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त मेंढपाळांना तातडीने मदत मिळावी आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र दुष्काळी पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी शेकडो मेंढपाळांनी दुपारी मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.

मेंढपाळ समाजसेवक अर्जुन नामदेवराव महानोर यांच्या नेतृत्वाखाली मेंढपाळ बांधवांनी एकत्र येत विभागीय आयुक्तालयाकडे मोर्चा काढला. यावेळी घोड्यावर स्वार होऊन घोषणा देत मेंढपाळांनी प्रशासनापर्यंत आपल्या व्यथा पोहोचवल्या. दुष्काळामुळे पशुधन जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दुष्काळग्रस्त मेंढपाळांच्या समस्या मांडण्यासाठी अर्जुन नामदेवराव महानोर यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. या निवेदनातून मेंढपाळांसाठी स्वतंत्र दुष्काळी पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मेंढ्या-शेळ्यांसाठी मोफत चारा उपलब्ध करून देणे, चारा खरेदीसाठी विशेष निधी मंजूर करणे आणि पशुधनासाठी पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय, मेंढ्या-शेळ्यांची मोफत पशुवैद्यकीय तपासणी करावी, आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत आणि दुष्काळाच्या काळात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
मेंढ्या-शेळ्यांचे संगोपन हा अनेक मेंढपाळ कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, चारा-पाण्याच्या टंचाईमुळे पशुधन जगविण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे मेंढपाळ कुटुंबांवर आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे.
या परिस्थितीत शासनाने केवळ तात्पुरती मदत न करता मेंढपाळांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र मदत पॅकेज जाहीर करावे, पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी आणि मेंढपाळ कुटुंबांना आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आता प्रशासन आणि शासन या मागण्यांवर कोणता निर्णय घेते, याकडे दुष्काळग्रस्त मेंढपाळांचे लक्ष लागले आहे.



