
मुरूमाऐवजी माती टाकून खड्डे बुजविल्याचा आरोप; थातूरमातूर दुरुस्तीमुळे रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात गोंडउमरी–राका मार्गांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. त्यातच खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाऐवजी मातीचा वापर केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गोंडउमरी–राका मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे चित्र आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, आजारी रुग्ण, शेतकरी आणि दुचाकीस्वारांना या मार्गावरून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामाच्या दर्जावरही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक मुरूम वापरण्याऐवजी मातीचा वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा प्रकारच्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे रस्ता किती दिवस टिकणार, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. पावसामुळे किंवा वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ही डागडुजी पुन्हा उखडल्यास सार्वजनिक निधीचा उपयोग नेमका कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

एकीकडे विकासकामांची भूमिपूजने आणि विविध कामांच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. रस्त्यांची नियमित देखभाल आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असताना, नागरिकांना खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने गोंडउमरी–राका मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासावा, खड्डे बुजविण्याच्या कामात योग्य साहित्याचा वापर होतो की नाही, याची खातरजमा करावी आणि आवश्यकतेनुसार कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, राका ग्रामस्थांना खड्ड्यांच्या त्रासातून मुक्ती कधी मिळणार? प्रशासन या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करणार की नागरिकांना आणखी काही काळ खराब रस्त्यांतूनच प्रवास करावा लागणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



