Amravati GraminChandur RailwaycitynewsLatest NewsMaharashtra

वणी बेलखेड्यात तान्हा पोळ्याचा उत्साह; चिमुकल्यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या!

मातीच्या बैलांसह बोलके देखावे ठरले आकर्षण; शेतमालाला भाव, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि वन्यप्राण्यांचा त्रासावर विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

चांदूर बाजार : तालुक्यातील वणी बेलखेडा येथे गावकऱ्यांच्या वतीने तान्हा पोळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. पारंपरिक सणाला सामाजिक आणि भावनिक स्वरूप देत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मातीच्या बैलांसह शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर आधारित विविध बोलके देखावे साकारले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या आपल्या कलाकृतीतून मांडत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

तान्हा पोळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी मातीचे आकर्षक बैल, शेतीची अवजारे आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित विविध देखावे तयार केले. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, पाण्याची टंचाई, पिकांचे नुकसान तसेच वन्यप्राण्यांचा वाढता त्रास अशा अनेक समस्यांचे प्रभावी चित्रण या देखाव्यांमधून करण्यात आले.

चिमुकल्यांनी साकारलेल्या या कलाकृती केवळ आकर्षणाचा विषय ठरल्या नाहीत, तर त्यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वास्तवही अधोरेखित झाले. पारंपरिक तान्हा पोळ्याच्या माध्यमातून नव्या पिढीला शेती, शेतकरी आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडण्याचा सुंदर प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

वणी बेलखेडा येथे अनेक वर्षांपासून तान्हा पोळ्याची ही परंपरा जपली जात आहे. गावातील दिवंगत व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा देतानाच नव्या पिढीमध्ये आपल्या मातीतल्या संस्कृतीविषयी जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्नही या कार्यक्रमातून करण्यात येतो.

देखावा स्पर्धेत चिमुकल्यांचे यश

देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. इशिका फुले, द्वितीय चि. विवान पाटील, तृतीय कु. अधिरा देशमुख, चतुर्थ कु. मिस्टी फुले, पाचवा चि. रोहन जावेद सौदागर, सहावा आयुष्य जडे, सातवा चि. चैतन्य चौधरी आणि आठवा चि. शिवास कोठाडे यांनी मिळवला.

वक्तृत्व स्पर्धेतही उत्स्फूर्त सहभाग

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम कु. भक्ती गावंडे, द्वितीय चि. देवांशु गावडे आणि तृतीय कु. मिस्टी फुले यांनी यश मिळवले. सर्व विजेत्यांना बक्षिसांसोबत ५०० रुपये रोख देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला ठाणेदार जाधव साहेब, राजू काळे, सिराम कोठाडे, अमर ठाकरे पोलीस पाटील, सुनील अलोने, अतुल ठाकरे, अशोक अलोने, इंगोले मॅडम, पत्रकार सुमित हरकूट, पत्रकार बादलकुमार डखरे, राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक आणि पत्रकार सुयोग गोरले, मंगेश देशमुख, प्रफुल्ल नवघरे, सुनील मोहोड आणि प्रफुल्ल अर्डक यांच्यासह गावातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिमुकल्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती आणि त्यांच्या कल्पकतेचे उपस्थितांनी कौतुक केले. पारंपरिक बैल, शेतीची अवजारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी उत्सुकता दाखवली.

तान्हा पोळ्याच्या माध्यमातून चिमुकल्यांनी केवळ परंपरा आणि संस्कृती जपली नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या समस्यांची जाणीवही समाजासमोर मांडली. त्यामुळे वणी बेलखेड्यातील तान्हा पोळा हा यंदा परंपरा, कला, संस्कृती आणि शेतकऱ्यांविषयीची संवेदना यांचा सुंदर संगम ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button