तान्हा पोळ्याच्या यात्रेत थरार! आकाश पाळण्यात महिलेचे केस बेरिंगमध्ये अडकले

पाळणा सुरू असतानाच केस ओढले गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत; जखमी महिलेला पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल
महागाव : यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे तान्हा पोळ्यानिमित्त भरलेल्या यात्रेत आकाश पाळण्यात थरारक दुर्घटना घडली. पाळण्यात बसलेल्या २५ वर्षीय महिलेचे केस अचानक पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने केस ओढले गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावरील केसांसह चामडी निघाल्याची गंभीर घटना घडली. जखमी महिलेला तातडीने पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तान्हा पोळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही एकदिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पुणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी तसेच यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. विशेषतः महिलांची मोठी गर्दी यात्रेत पाहायला मिळाली.
मात्र, गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आकाश पाळण्यात ही थरारक दुर्घटना घडली. फुलसावंगी येथील बाली मारोती टाळीकोटे, वय २५ वर्षे, या आकाश पाळण्यात बसल्या असताना अचानक त्यांचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकले.
पाळणा सुरू असल्यामुळे काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्यावरील केसांसह चामडी निघाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे यात्रास्थळी एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे आणि जमादार सुहास कायटे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने आकाश पाळणा थांबवला. त्यानंतर जखमी महिलेला पाळण्यातून बाहेर काढण्यात आले.
जखमी महिलेची प्रकृती लक्षात घेता तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यांना पुढील उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित यात्रेत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असताना ही दुर्घटना घडल्याने यात्रेतील सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मनोरंजनाच्या साधनांची सुरक्षितता, देखभाल आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.



