नांदेडमध्ये दहीहंडी उत्सवावरून वाद! दुष्काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून शेतकऱ्यांचा संताप

पावसाअभावी सोयाबीन-कापूस संकटात; हिंगोली गेटवरील भव्य दहीहंडी कार्यक्रमाच्या खर्चावरून प्रश्नचिन्ह
नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला असताना दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळण केल्याचा आरोप होत आहे. नांदेड दक्षिणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या वतीने हिंगोली गेट परिसरात भव्य दहीहंडी आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने आता या आयोजनावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन आणि कापूस पिकांवर संकट ओढावले आहे. अनेक भागांमध्ये पिके वाळत असून शेतकरी कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचा आरोप करत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हिंगोली गेट परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी आनंद उत्सवात गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण ठरले. मात्र दुष्काळसदृश परिस्थितीत अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन आणि त्यासाठी होणाऱ्या संभाव्य खर्चावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यापूर्वी भाजप आमदार अमर राजूरकर यांचे पुत्र आशुतोष राजूरकर यांच्या कार्यक्रमात यूट्यूबर एल्व्हिश यादव यांच्यावर करण्यात आलेल्या खर्चाचा मुद्दाही चर्चेत आला होता. त्यामुळे नांदेडमध्ये राजकीय नेत्यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांवरील खर्चाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, याबाबत माध्यम प्रतिनिधींनी आमदार अंबादास दानवे यांना विचारणा केली असता, दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांना नाचवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या भूमिकेमुळे दहीहंडी उत्सवाच्या स्वरूपावरूनही राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण प्रकरणात दहीहंडी कार्यक्रमाच्या आयोजनामागील खर्च किती होता आणि तो नेमका कोणाकडून करण्यात आला, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या खर्चाचा आरोप आणि त्यासंदर्भातील दावे याबाबत संबंधित आयोजकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात असताना एका बाजूला मदतीची मागणी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने नांदेडमधील या दहीहंडी उत्सवावरून राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
बाईट : गौतमी पाटील — नृत्यांगना
बाईट : अंबादास दानवे — आमदार



