श्रीनिकाच्या उपचारासाठी मदतीचा हात; रोहित पवारांनी घेतली अभियानाची माहिती

रामटेकच्या परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रमाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट; नागरिकांना मदतीचे आवाहन
रामटेक : रामटेकमधून माणुसकीचा संदेश देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहितदादा पवार यांनी रामटेक येथील परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रमाला सदिच्छा भेट देत आश्रमातील सेवक-सेविका आणि बालगोपालांशी संवाद साधला. याच भेटीदरम्यान अवघ्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या श्रीनिका रोहित माकडे हिच्या उपचारासाठी सुरू असलेल्या मदत अभियानाचीही त्यांनी माहिती घेतली.
आश्रमात पोहोचल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि आई वाराणसी यांच्या प्रतिमेला नमन करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी आश्रमाच्या सामाजिक आणि सेवाभावी कार्याची माहिती जाणून घेतली. संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि सेवाभावी कामकाजाबाबतही त्यांनी पदाधिकारी व सेवकांशी चर्चा केली.

यावेळी रामटेक परिसरातील चिमुकली श्रीनिका रोहित माकडे हिच्यासाठी सुरू असलेल्या मदत अभियानाची माहितीही आमदार रोहित पवार यांनी घेतली. श्रीनिका जन्मापासून SMA Type 2 या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. तिच्या उपचारासाठी तब्बल १० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे.
श्रीनिकाच्या उपचारासाठी नागरिकांच्या लोकवर्गणीतून आतापर्यंत सुमारे ७५ लाख रुपये जमा झाले आहेत. मात्र, उपचारासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या तुलनेत ही रक्कम अद्याप अपुरी आहे. त्यामुळे श्रीनिकाला नवजीवन मिळावे यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे.
श्रीनिकाच्या उपचारासाठी सुरू असलेले मदत अभियान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे आणि रामटेकसह परिसरातील नागरिकांनी आपल्या परीने मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
एका चिमुकल्या मुलीच्या उपचारासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. उपचाराचा खर्च मोठा असला तरी प्रत्येकाची छोटीशी मदत श्रीनिकाच्या कुटुंबासाठी मोठी आशा ठरू शकते.
या भेटीदरम्यान सलील अनिलजी देशमुख, रमेश कारामोरे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच आश्रमाचे सेवक-सेविका उपस्थित होते.
श्रीनिकाच्या उपचारासाठी अजून मोठ्या निधीची आवश्यकता आहे. तिच्या आयुष्यासाठी प्रत्येक मदतीचा हात महत्त्वाचा आहे. रामटेककरांकडून सुरू असलेले मदत अभियान आता अधिक व्यापक होऊन श्रीनिकाच्या उपचारासाठी आवश्यक निधी उभारला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सिटी न्यूजसाठी अजय मेहरकुळे, रामटेक



