रामटेक मतदारसंघातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी!

मतदार यादीचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध; ३० सप्टेंबरपर्यंत नाव तपासा, दुरुस्ती आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन
रामटेक : रामटेक विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण SIR 2026 अंतर्गत मतदार यादीचा प्रारूप मसुदा ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही, याची तातडीने तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मतदार यादी तपासल्यानंतर नावामध्ये काही चूक आढळल्यास किंवा मतदार यादीबाबत कोणताही आक्षेप असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत आवश्यक दुरुस्ती किंवा हरकत नोंदवता येणार आहे.
नवीन मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना ७, तर नावातील दुरुस्ती किंवा इतर आवश्यक बदलांसाठी नमुना ८ भरता येणार आहे.
हे अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांच्याकडे सादर करता येतील. तसेच नागरिकांना ऑनलाइन पद्धतीनेही आवश्यक अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मतदार यादीमध्ये नाव असणे हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासून घ्यावे. नावामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा आवश्यक बदल करायचा असल्यास निर्धारित मुदतीपूर्वी अर्ज करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेषतः नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाले आहे की नाही, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरित मतदार, नावातील दुरुस्ती आवश्यक असलेले मतदार आणि मतदार यादीबाबत आक्षेप असणाऱ्या नागरिकांनीही संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात रामटेकचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रियेश महाजन यांनी नागरिकांना मतदार यादी तपासण्याचे आणि आवश्यक दुरुस्ती वेळेत करून घेण्याचे आवाहन केले आहे.
बाईट
प्रियेश महाजन
उपविभागीय अधिकारी, रामटेक
मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासणे आता अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी आवश्यक दुरुस्ती किंवा आक्षेप नोंदवून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आपले नाव मतदार यादीत आहे का? एकदा नक्की तपासा… कारण मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी मतदार यादीतील आपले नाव आणि माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सिटी न्यूजसाठी अजय मेहरकुळे, रामटेक.



