BreakingNewscitynewsLetest NewsLocal News

शिवनिबांध ग्रामसभेत ग्रामसेवक गैरहजर; विकासकामांच्या हिशोबावरून ग्रामस्थांचा संताप

ग्रामपंचायतीच्या कामांवर गंभीर आरोप; नालीसफाई आणि विकासकामांची बिले तपासण्याची मागणी, जनआंदोलनाचा इशारा

भंडारा | प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनिबांध येथे आयोजित ग्रामसभा ग्रामसेवकांच्या गैरहजेरीमुळे चांगलीच वादळी ठरली. ग्रामपंचायतीच्या विविध कामांचा खर्च, विकासकामे आणि बिलांबाबत ग्रामस्थांनी थेट सवाल उपस्थित केले. मात्र ग्रामसेवक उपस्थित नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.

ग्रामसेवकांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. रस्ते, नालीसफाई आणि ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा हिशोब ग्रामस्थांनी मागितला.

विशेषतः 2025 मधील मान्सूनपूर्व नालीसफाईचे काम प्रत्यक्षात न करताच त्याची बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. काही विकासकामे प्रत्यक्षात न करताही त्यांची बिले काढण्यात आल्याचा आरोपही ग्रामसभेत करण्यात आला.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे शासकीय दस्तऐवज, खर्चाची कागदपत्रे आणि संबंधित बिले तपासण्याची मागणी केली. मात्र महत्त्वाच्या कागदपत्रांच्या चाव्या ग्रामसेवकांकडे असल्याचे सांगण्यात आल्याने कागदपत्रांची प्रत्यक्ष पाहणी करता आली नाही.

या प्रकारामुळे ग्रामपंचायत कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामसेवकांनी स्वतः उपस्थित राहून पुन्हा ग्रामसभा घ्यावी आणि ग्रामपंचायतीच्या कामांचा, खर्चाचा तसेच बिलांचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

काही दिवसांत पुन्हा ग्रामसभा घेऊन हे प्रश्न निकाली काढले नाहीत, तर गटविकास अधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

आता ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची प्रशासनाकडून चौकशी होते का आणि शिवनिबांध ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button