गणपती चौकात दुधाचा पिकअप पलटी; शेकडो लिटर दूध वाया

आष्टी शहरातील घटना; चार जण किरकोळ जखमी, रस्त्याच्या संथ कामावर नागरिकांचा संताप
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील गणपती चौक परिसरात दुध वाहतूक करणारा पिकअप वाहन पलटी झाल्याने शेकडो लिटर दूध रस्त्यावर सांडून वाया गेल्याची घटना घडली आहे. या अपघातात वाहनातील चार जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुका दूध संघाकडे संकलित केलेले दूध घेऊन पिकअप वाहन जात असताना गणपती चौक परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. वाहन पलटी झाल्यानंतर त्यामधील दूध रस्त्यावर सांडले आणि मोठे आर्थिक नुकसान झाले.
अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी पाठवले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या परिसरातील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. खराब रस्ता आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.
सध्या या अपघाताची नोंद संबंधित यंत्रणेकडे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



