AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsMaharashtraPoliticspolitics

अमरावती विधान परिषद निवडणूक : महायुतीचा ‘फायनल गेम प्लॅन’ सुरू!

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अमरावतीत हायप्रोफाईल बैठक; प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयासाठी रणनीतीला अंतिम रूप

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना महायुतीने विजयासाठी कंबर कसली असून अमरावतीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत महायुतीतील सर्व प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयासाठी आखली जाणारी रणनीती, मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा आराखडा, बूथस्तरीय नियोजन आणि प्रचारयंत्रणा अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत सखोल चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे.

बैठकीला भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे, युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, सुरेखा ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बदरे यांच्यासह महायुतीचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही बैठक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील रणनीती निश्चित करणारी बैठक म्हणून पाहिली जात आहे. मतदारांशी थेट संपर्क वाढवणे, प्रत्येक मतदारापर्यंत महायुतीचा संदेश पोहोचवणे आणि प्रचार मोहिमेला अधिक धार देणे यावर विशेष भर दिला जात आहे.

एकीकडे विरोधकांनीही निवडणुकीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली असताना, दुसरीकडे महायुतीकडून सर्व घटक पक्षांना एकत्र आणत विजयाचा मार्ग अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अमरावती विधान परिषद निवडणुकीतील ही बैठक केवळ औपचारिक नसून आगामी निकालाची दिशा ठरवणारी निर्णायक राजकीय चाल मानली जात आहे. आता या बैठकीतून कोणते अंतिम निर्णय समोर येतात आणि महायुतीचा हा फायनल गेम प्लॅन कितपत यशस्वी ठरतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button