NEET-CBSE पेपर घोटाळ्याविरोधात NSUIचा मशाल मोर्चा; विद्यार्थ्यांपेक्षा कार्यकर्त्यांची उपस्थिती, वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आंदोलन

अमरावती : NEET आणि CBSE पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ NSUIच्या वतीने अमरावती शहरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असला, तरी आंदोलनाची चर्चा पेपर घोटाळ्यापेक्षा कमी उपस्थिती आणि वाहतूक कोंडीमुळे अधिक रंगताना दिसली.
मागील काही दिवसांपासून या मशाल मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली होती. शहरभर प्रचार, बैठकांचे आयोजन आणि विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी अपेक्षित संख्येने विद्यार्थी उपस्थित न राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
संध्याकाळी पाच वाजता मोर्चा सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सहभागींची संख्या कमी असल्याने मोर्चा सुमारे दोन तास उशिरा, म्हणजे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली. मोर्चात सुमारे ३०० जण सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मशाल मोर्चा असतानाही अवघे १० ते १५ जणांच्या हातात मशाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बलवंत वानखेडे आणि प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. इरविन चौक ते जयस्तंभ चौक असा मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, मोर्चामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. इरविन चौक हा अमरावतीतील अत्यंत वर्दळीचा भाग असून रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे आधीच वाहतुकीचा ताण आहे. त्यातच मशाल मोर्चामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. जयस्तंभ चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.
वाहतूक कोंडीत कार्यालयातून घरी परतणारे कर्मचारी, व्यावसायिक वाहने आणि इतर नागरिक अडकले. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनानंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठविण्याचा दावा NSUI पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा सहभाग मर्यादित का राहिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच फक्त एक किलोमीटरच्या मोर्चातून विद्यार्थ्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर कितपत पोहोचतील, यावरही चर्चा सुरू आहे.
लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. NEET-CBSE पेपर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न महत्त्वाचा असला, तरी आंदोलन प्रभावी आणि व्यापक स्वरूपात होणेही तितकेच आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.



