AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ अंतर्गत अमरावतीत भव्य सायकल रॅली; पेट्रोल-डिझेल बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमरावती : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) उपक्रमाअंतर्गत ‘नेशन फर्स्ट चॅलेंज : पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा’ या अभियानाचा भाग म्हणून अमरावतीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक सायकल दिन २०२६ च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरणपूरक वाहतूक, इंधन बचत आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

‘माय भारत अमरावती’च्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत अमरावती महानगरपालिका, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय आणि अमरावती सायकलिंग असोसिएशन यांचा संयुक्त सहभाग आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि “फिट, हेल्दी आणि एकता” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा आहे. वाढते प्रदूषण, इंधनावरील वाढते अवलंबित्व आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता सायकलचा वापर वाढविण्याची गरज आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या सायकल रॅलीत अमरावती शहरातील शेकडो युवक, नागरिक आणि सायकलप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रॅलीचे आयोजन रविवार, ७ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले असून जिल्हा स्टेडियम, अमरावती येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. जिल्हा स्टेडियम येथून निघणारी ही रॅली बाबासाहेब आंबेडकर चौक, राजकमल चौक, पुन्हा बाबासाहेब आंबेडकर चौक, गर्ल्स हायस्कूल मार्गे अमरावती ग्रामीण पोलीस ग्राउंड येथे समाप्त होणार आहे.

पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सायकल वापराबाबत सकारात्मक जनजागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यात अशा उपक्रमांमधून अधिकाधिक लोकांनी सायकलला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, असा संदेशही या रॅलीतून दिला जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button