‘दर 4 तासांनी स्वच्छता’! एसटी स्थानके आणि बसेस होणार चकाचक; राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला आहे. मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष Pratap Sarnaik यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रमुख बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रवासी-अनुकूल बनविण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक स्वच्छता यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार आहे.
परळ बसस्थानकात आयोजित कार्यक्रमात अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. राज्यातील प्रमुख बसस्थानके आणि परिसराची नियमित स्वच्छता करण्यात येणार असून एसटी बसेस, विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीचा वापर करतात. त्यामुळे त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. ही मोहीम प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि समाधानकारक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छता मोहिमेदरम्यान आढळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांचे संकलन करून त्यांचे पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) पाठविण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून विविध उपयुक्त आणि टिकाऊ उत्पादने तयार करण्यात येणार आहेत.
स्वच्छता ही एकदिवसीय मोहीम नसून सातत्याने राबविण्याची प्रक्रिया असल्याचे सांगत मंत्री सरनाईक यांनी या उपक्रमावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित देखरेख ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले. प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान Narendra Modi आणि मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने राज्यातील सर्व 251 आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. याच अनुषंगाने परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजनही मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.



