India NewsLatest NewsWeather Report

नवतपाचा तडाखा सुरू! विदर्भ भट्टीसारखा तापला; ब्रह्मपुरी देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण

देशभरात नवतपाला सुरुवात झाली असून येत्या २ जूनपर्यंत तीव्र उष्णतेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करताच सुरू झालेल्या या नऊ दिवसांच्या कालावधीत पृथ्वी अक्षरशः भट्टीसारखी तापणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांसह विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मे महिन्याच्या अखेरीसही उन्हाचा तडाखा कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून देशातील अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागात उष्णतेची तीव्रता सर्वाधिक जाणवत असून ब्रह्मपुरी हे रविवारी देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरले. येथे तब्बल ४७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, जे सरासरीपेक्षा ४.६ अंशांनी अधिक आहे.

विदर्भातील इतर शहरांमध्येही तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. चंद्रपूरमध्ये ४५.६ अंश, वर्ध्यात ४५.५ अंश, नागपूरमध्ये ४५.४ अंश, अमरावतीमध्ये ४५.२ अंश तर गोंदियामध्ये ४५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उष्ण वारे आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राजधानी दिल्लीतही उष्णतेची लाट कायम आहे. रविवारी दिल्लीतील कमाल तापमान ४३.६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. अयानगर आणि रिज परिसरात ४४.६ अंश तापमानाची नोंद झाली. त्याशिवाय लोधी रोडमध्ये ४३.८ अंश, पालममध्ये ४३.७ अंश आणि सफदरजंगमध्ये ४३.६ अंश सेल्सियस तापमान राहिले.

हवामान तज्ज्ञांच्या मते, नवतपाच्या काळात सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडत असल्याने जमिनीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे दिवसासोबत रात्रीदेखील उष्णतेचा त्रास जाणवतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेट ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

२०२६ मध्ये नवतपाचा कालावधी २५ मे ते २ जून दरम्यान असून या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button