BeedcitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

बीडमध्ये न्यायाधीशांच्या नावाने व्हॉट्सअ‍ॅपवर फसवणुकीचा प्रयत्न; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड येथे कार्यरत असलेल्या एका न्यायाधीशांचा फोटो आणि नाव वापरून काही नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे न्यायव्यवस्थेच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अज्ञात व्यक्तीने न्यायाधीशांचा फोटो आणि नाव प्रोफाइलवर ठेवत काही जणांशी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधला. विविध कारणे सांगत पैशांची मागणी करण्यात आली होती. मात्र संबंधितांना वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक 11 अंकी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना संशय आला.

यानंतर संबंधितांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक चौकशीत हा प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बीड सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित मोबाईल क्रमांक आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद संदेशांपासून सावध राहावे आणि कोणत्याही व्यक्तीच्या नावावरून आलेल्या आर्थिक मागण्यांची खातरजमा केल्याशिवाय पैसे पाठवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button