कांद्याच्या दरासाठी शेतकरी आक्रमक! चांदवडमध्ये महामार्गावर ‘रास्तारोको’; पोलिसांशी झटापट

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून आज मुंबई-आग्रा महामार्गावर मोठे आंदोलन छेडण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन ते अडीच तास विस्कळीत झाली. आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळपासूनच हजारो शेतकरी चांदवड येथे एकत्र जमले होते. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. भर उन्हात महामार्गावर बसून शेतकऱ्यांनी ‘चटणी-भाकरी आंदोलन’ करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला हमीभाव द्यावा, निर्यातबंदीचे धोरण बदलावे आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी आणि मालवाहतूक वाहनचालकांना मोठा फटका बसला. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी काही आंदोलकांनी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक आणि इतर वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि झटापट झाली.
स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अखेर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांसह अनेक आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेत आंदोलन हटवले. दरम्यान, या घटनेमुळे चांदवड परिसरात काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे राज्यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले असून, सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.



