Crime NewsLatest NewsMaharashtra

औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना; पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कदम यांचा संशयास्पद मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पोलीस दलाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. औंढा नागनाथ मंदिर संस्थांच्या भक्त निवासस्थानातील एका खोलीत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कदम हे गेल्या ११ महिन्यांपासून औंढा नागनाथ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंदिर परिसरात सुरक्षा आणि बंदोबस्ताची जबाबदारीही ते पार पाडत होते. काल सायंकाळच्या सुमारास मंदिर संस्थांच्या भक्त निवासातील एका खोलीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, खोलीत ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह आढळून आला.

प्राथमिक माहितीनुसार, कर्तव्य बजावल्यानंतर विश्रांतीसाठी ते भक्त निवासात गेले असावेत आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांनी सांगितले की, कदम हे काही महिन्यांपासून मंदिर परिसरात विशेष कर्तव्य बजावत होते. तसेच, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना काही काळापासून एका आजारानेही ग्रासले होते.

ज्ञानेश्वर कदम यांच्या मृतदेहाचे औंढा नागनाथ उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी रांजाळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि नातवंड असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण कदम कुटुंबासह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कदम कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांकडून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button