citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये बांधकाम साईटवर मजुरांमध्ये जीवघेणा वाद; लाकडी बल्लीने हल्ला, एक गंभीर जखमी

नागपूरच्या गोरेवाडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांमध्ये झालेल्या भांडणाने हिंसक वळण घेत एका मजुरावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला. दारूच्या नशेत झालेल्या या वादात एका मजुराने दुसऱ्याच्या डोक्यावर जड लाकडी बल्लीने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा परिसरातील सविनाज सोसायटीजवळ आणि इकरा स्कूलच्या पाठीमागील बांधकाम साईटवर घडली. येथे सुनील बरमैया आणि दशरत रूपदीप हे दोघे मजूर बांधकामाचे काम करत होते. दोघेही कामाच्या ठिकाणीच वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास दोघांनी एकत्र बसून मद्यपान केले. त्यानंतर आरोपी दशरत रूपदीप आपल्या भाड्याच्या खोलीवर गेला. काही वेळाने सुनील बरमैया हा दशरतच्या खोलीवर पोहोचला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की दोघे पुन्हा बांधकाम साईटवर आले आणि तिथेही जोरदार बाचाबाची सुरूच राहिली.

दरम्यान, संतापाच्या भरात दशरत रूपदीप याने जवळच पडलेली जड लाकडी बल्ली उचलली आणि सुनील बरमैया यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर मार लागल्याने सुनील रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुनील बरमैया याला त्वरित मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सर्जिकल आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी बांधकाम साईटचे ठेकेदार प्रदीप लांजेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दशरत रूपदीप याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मानकापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय अमोल कांबळे, पीएसआय जावेद तडवी आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

दारूच्या नशेतून सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांत जीवघेण्या हल्ल्यात परिवर्तित झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून जखमी मजुराची प्रकृती स्थिर होण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button