Uncategorized

पुण्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर! कोंढवा-हडपसर जलमय, रस्त्यांना नदीचे स्वरूप

पुणे शहरात आज मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भाग जलमय झाले आहेत. कोंढवा परिसरात अतिवृष्टीसारखा पाऊस पडत असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हडपसरमधील वाडकर मळा परिसरात तर रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. वाहनचालक आणि नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पहिल्याच पावसात पुणे महानगरपालिकेच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केला आहे.

दरम्यान, मुळशी तालुक्यात दुपारी तीन वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. ढगांचा गडगडाट आणि अचानक वाढलेल्या पावसामुळे परिसरात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते आणि दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील उपनगरांसह मध्यवर्ती भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुण्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button