citynewsLatest NewsMaharashtra

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदी संदीप देशमुख यांची शपथ

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी संदीप जगन्नाथ देशमुख यांनी अधिकृतपणे स्वीकारली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवनाच्या सातव्या मजल्यावरील आयोगाच्या कार्यालयात हा शपथविधी सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग, अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव, नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी आणि पुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सहभाग नोंदवला.

संदीप देशमुख यांनी यापूर्वी अपर आयुक्त तसेच विशेष निबंधक सहकारी संस्था या पदांवर कार्य करताना दीर्घ प्रशासकीय अनुभव मिळवला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशासनातील कार्यशैलीचा लाभ महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कामकाजाला होणार असल्याचा विश्वास मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना श्रीवास्तव यांनी सांगितले की, जनतेला शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अत्यंत महत्त्वाचा आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, संबंधित अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि संपूर्ण यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेणे ही राज्य सेवा हक्क आयुक्त पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांना संदीप जगन्नाथ देशमुख यांना नागपूर विभागीय राज्य सेवा हक्क आयुक्त पदाची शपथ देण्यासाठी अधिकृत केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी राज्य सेवा हक्क आयुक्त, पुणे दिलीप शिंदे यांनी केले. तसेच आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती.

नागपूर विभागीय आयुक्त म्हणून संदीप देशमुख यांच्या नियुक्तीकडे प्रशासनातील महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात असून, जनतेला शासकीय सेवा अधिक सुलभ, वेळेत आणि प्रभावी पद्धतीने मिळण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button