सावनेरमध्ये भरधाव अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक; सचिन चचाने यांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात वकील-परसोडी रोडवर भरधाव अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृतकाचे नाव सचिन दशरथ चचाने (वय ४५) असे असून ते डोरली भिंगारी, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथील रहिवासी होते. त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक एमएच ४० क्यू ६७९२ असा आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तत्काळ सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना याबाबत कळवले. त्यानंतर हितेश बनसोड यांच्या मदतीने जखमी सचिन चचाने यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, सावनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर धडक देणारे अज्ञात वाहन चालकासह घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी वाहनाचा शोध घेतला जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच वकील-परसोडी रोडवर सातत्याने वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र पोलीस अंतर्गत सावनेर पोलीस करीत आहेत.



