AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती महानगरपालिकेचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम ठरला आधार; हरवलेल्या तुळजाबाई गवई यांना अवघ्या तीन तासांत घरचा मार्ग

अमरावती महानगरपालिकेच्या ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमाने पुन्हा एकदा माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. हरवलेल्या वृद्ध महिलेला शोधून त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचवण्यात महानगरपालिका आणि आधार केंद्राच्या टीमला यश आले.

13 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास संजय गांधी नगर क्रमांक 2 येथील तुळजाबाई गवई या घराबाहेर पडल्या. चालत चालत त्या प्रशांत नगर परिसरातील बगीच्यापर्यंत पोहोचल्या. दिवसभर त्या घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते.

सायंकाळी 7 वाजता सामाजिक कार्यकर्त्या सुचिता कारमोरे यांनी माहिती दिली की, शुभम कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ एक वृद्ध महिला बसलेल्या आहेत. त्यांच्या पायाला गंभीर जखम होती आणि त्या स्वतःचे नाव तुळजाबाई गवई असे सांगत होत्या.

माहिती मिळताच आधार केंद्राच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वृद्ध महिलांकडून मिळालेल्या “संजय गांधी नगर” या एकमेव धाग्यावरून शोधमोहीम सुरू करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर रात्री 10.30 वाजता त्यांच्या घराचा शोध लागला.

तुळजाबाई या आपल्या मुलगी पद्माताई काळपांडे यांच्याकडे राहत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, कुटुंबीय त्यांची हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याकडे निघाले असतानाच आधार टीमकडून तुळजाबाई सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली.

तुळजाबाई घरी परतताच कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी अमरावती महानगरपालिका, आधार केंद्राची टीम आणि मदत करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.

या कार्यात सुचिता कारमोरे, ज्योती राठोड, राजीव बसवनाथे आणि नितीन नांदूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

अमरावती महानगरपालिकेचा ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम केवळ प्रशासकीय सेवा नसून गरजूंना वेळेवर मदतीचा हात देणारी माणुसकीची साखळी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button