अमरावतीच्या फ्रेजरपुरात दोन गटांमध्ये तणाव; अॅट्रॉसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा परिसरात दोन गटांतील वाद चिघळल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महालक्ष्मी कॉलनीमध्ये धार्मिक पूजा सुरू असताना झालेल्या वादानंतर दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिल्या तक्रारीनुसार, एका महिलेने अश्लील शिवीगाळ, मारहाण आणि जातीवाचक अपमान केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अॅट्रॉसिटी अॅक्ट) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर 12 मेच्या रात्री दोन्ही गटांतील शेकडो महिला व पुरुष फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत फिर्यादी महिला आणि तिच्या मैत्रिणीला मारहाण, अश्लील शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महिला आणि पुरुषांसह एकूण 28 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल तपास सुरू आहे.
या घटनेमुळे फ्रेजरपुरा परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



